Nashik Samruddhi Mahamarg नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिक समृद्धी महामार्गाबद्दलची माहिती पाहणार आहोत. समृद्धी महामार्गावर शिवडे (ता. सिन्नर) येथे इंटरचेंज सुविधा उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) पाठवला आहे. जिल्ह्यातील इतर इंटरचेंजच्या तुलनेत हा इंटरचेंज नाशिक शहरासाठी सर्वात जवळचा ठरणार असल्याची माहिती विभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश देवरे यांनी दिली आहे. आगामी कुंभमेळ्यासाठीही हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे.
मित्रांनो, कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी प्रस्तावित जागेची पाहणी नुकतीच सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी केली आहे. समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या भाविकांना कुंभमेळ्यासाठी नाशिकला येण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध व्हावा, या उद्देशाने ही इंटरचेंज सुविधा प्रस्तावित करण्यात आली आहे. या सुविधेमुळे नाशिकच्या रस्ते कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी भर पडणार आहे.
सध्या नाशिक येथील प्रवाशांना नागपूर किंवा मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे 40 किलोमीटर किंवा इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथे 43 किलोमीटर अंतर पार करावे लागते. याशिवाय नाशिक–सिन्नर आणि नाशिक–भरवीर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.प्रस्तावित शिवडे कनेक्टिव्हिटीमुळे जळगाव व मालेगाव या भागातून येणारी वाहने कुंभमेळ्याच्या काळात रिंग रोडमार्गे सय्यद पिंपरी, ब्राह्मणवाडी, शिंदे, चिंचोली, पांढुर्ली या राज्य मार्गाने शिवडे येथील इंटरचेंजकडे जाऊ शकतील. त्यामुळे या भागातील वाहनांनाही समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होईल.
तसेच मुंबई, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्गाने नाशिकला येणाऱ्या प्रवाशांसाठी गोंदे किंवा भरवीर इंटरचेंजपेक्षा शिवडे इंटरचेंज अधिक जवळचे ठरणार आहे. त्यामुळे किमान 30 मिनिटांचा प्रवास वाचण्याची शक्यता आहे.याशिवाय नाशिकमधील बिटको चौक येथून भगूरमार्गे पांढुर्ली–शिवडे या मार्गाने वाहनांची कनेक्टिव्हिटी साधता येणार आहे.
समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना शिवडे येथून नाशिकला कमी वेळात पोहोचता येईल. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठीही नाशिक रोड ते शिवडे हे अंतर सुमारे 25 किलोमीटर असल्यामुळे हा मार्ग सोयीचा ठरणार आहे.सध्या या कनेक्टिव्हिटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश देवरे यांनी दिली.
